किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच. तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी,मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे. 'ज्याचे किल्ले त्याचे राज्य' अशी म्हणच होती त्या काळी. किल्ल्यांचे डोंगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते. निरनिराळ्या सरदार, वतनदारांच्या गढ्या असत. गढी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत.दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहेत. सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे. येथे छुप्या बोगद्यांचे जाळेही आहे. सुरक्षिततेच्या कारणांमुळे ते आता बंद आहे. तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग. भक्कम तटबंदी, चिलखती बुरूज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.


0 Comments